लगोर्‍या

लगोऱ्या हा एक महाराष्ट्र व भारतातील अन्य राज्यांमध्ये प्रचलित असलेला एक पारंपारिक मैदानी खेळ आहे. लगोऱ्या, चेंडू एवढेच साहित्य, साधे सोपे नियम व छोटेसे मैदान हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे. खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगोऱ्या एकावर एक ठेवणे व त्या चेंडूने विस्कळीत करणे.

क्रीडांगण

या खेळासाठी १८.२८ मीटर(६० फूट) ते ३०.४८ मीटर(१०० फूट) व्यासाचे वर्तुळ असते. वर्तुळाच्या मध्यभागी १.८२ मीटर(६ फूट) व्यासाचे एक छोटे वर्तुळ लगोरी ठेवण्यासाठी असते.

खेळाचे स्वरूप व नियम

७ वा ११ खेळाडूंचे असे दोन संघ असतात.
या खेळात वापरल्या जाणाऱ्या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. पूर्वी ही लगोरी फरशीच्या वा विटांच्या तुकड्याची असे. प्रत्येक संघातील एक एक खेळाडू लगोरी फोडण्यासाठी येतो. त्यास नेमक्षेत्रातून म्हणजेच क्रीडांगणाच्या मध्यरेषेपासून ४.५७ मीटर(१५ फूट) ते ९.१४ मीटर(३० फूट) अंतरावर १.८२ मीटर(६ फूट) लांबीची समांतर नेमरेषा आखतात. या रेषेभोवतीचा काटकोन चौकोन म्हणजे नेमक्षेत्र होय. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडण्यासाठी फेकलेला चेंडू अडविण्यासाठी वा झेलण्यासाठी रचलेल्या लगोरीच्या मागे विरुद्ध संघाचा एक प्रमुख क्षेत्ररक्षक व डतर दहा क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणाऱ्या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात. लगोरी फोडणारा लगोरी फोडतानाही बाद हाऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लगोरीमागील किंवा शेजारील क्षेत्ररक्षकाने वरचेवर झेलला तर तो बाद होतो. लगोरी फोडणाराने लगोरी फोडली की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणाऱ्या खेळाडूंपैकी एकानेच एकदाच पायाने लाथाडायला परवानगी असते. ज्यांनी लगोरी फोडली आहे त्याच संघातील खेळाडूंनी लगोऱ्या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकांचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणारांपैकी एकाला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला तरी सर्व संघ बाद होतो. मात्र क्षेत्ररक्षकांकडून चेंडू न लागता जर लगोरी रचली तर त्या संघास एक गुण मिळतो. एखाद्या खेळाडूस चेंडू लागून तो संघ जर बाद झाला तर दुसरा संघ खेळण्यास येतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडूंना लगोरी फोडण्याची संधी मिळेपर्यंत खेळ चालतो. ज्या संघाच्या अधिक लगोऱ्या होतात म्हणजेच अधिक गुण होतात तो संघ विजयी होतो.
लगोर्‍याच्या सामन्यात प्रत्येक डावास ८ मिनिटे वेळ असतो. प्रत्येक बाजूचे दोन डाव खेळवले जातात. खेळणार्‍या पक्षास लगोरी पाडण्याबद्दल प्रत्येक वेळी २५ गुण मिळतात. लगोरी रचण्याबद्दल प्रत्येक लगोरीस ५ गुण असतात. मारणार्‍या पक्षास गडी मारण्याबद्दल प्रत्येक गडयास ५ गुण मिळतात. ८ मिनिटांच्या आंत विरूद्ध बाजूचे सर्व गडी मारून डाव पुरा केल्यास राहिलेल्या प्रत्येक मिनिटास ५ गुण मिळतात. नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येक नियमोल्लंघनाबद्दल ५ गुण कमी करतात. सामान्यासाठी एक पंच व एक हिशेबनीस असतो. पंच डाव चालू असताना गडी मेल्याबद्दल किंवा नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दलचा व इतर तक्रारींचा निकाल देतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा