नाणेघाट किल्ला

 २५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर फोडून ह्या मार्गाची निर्मिती केली गेली.
इतिहास :
नाणेघाट या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल की हा घाट फारच पुरातन आहे. नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला.
प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर फोडून ह्या मार्गाची निर्मिती केली गेली. सातवाहन कुल ते महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्यांचेराज्य इ.स. पूर्व अडीचशे वर्ष तर ते इ.स. नंतर अडीचशे वर्षे असे जवळजवळ पाचशे वर्ष होते.
प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये परकीय लोक विशेषतः रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. या व्यापाऱ्यांकडून जकात जमा केली जाई. त्या जकातीचा दगडी रांजण आजही येथे पहावयास मिळतो.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
नाणेघाटाची संरक्षक फळी ही शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या चार किल्ल्यानी बनलेली आहे. साठ मीटर लांब आणि जागोजाबी दोन ते पाच मीटर रुंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे. या नळाच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे. अदमासे चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असे. जकातकर रुपाने यात तत्कालीन ‘कर्षापण’ नावाची नाणी टाकली जात असत.
नाणेघाट चढून गेल्यावर प्रथमदर्शनी दृष्टिक्षेपात पडणारी कातळात कोरलेली ऐसपैस आणि सुंदर गुहा हेच येथील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय. या गुहेत साधारणतः ४०-४५ जण राहू शकतात. सध्या वापरण्यात येणाऱ्या गुहेत तिन्ही भिंतीवर लेख आहेत. हा लेख एकूण २० ओळींचा असून मध्ये आगातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत.
हा लेख ब्राम्ही लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत. पुराणकालातील इतकी संख्या असलेल्या भारतातील हा प्राचीन असा लेख आहे. या लेखात सातवाहन सम्राज्ञी ‘नागतिका’ हिने केलेल्या यज्ञांची नावे आहेत. येथे वाजपेय, राजसूय, अश्वमेध अशा प्रकारचे यज्ञ केले असल्याचे उल्लेख सापडतात. या यज्ञात ब्राह्मणांना केलेल्या दानांचा देखील उल्लेख या लेखांमध्ये आढळतो.
या गुहेत सातवाहनांची शिल्पे देखील कोरलेली आहेत. यापैकी पहिले शिल्प सातवाहन संस्थापक शालिवाहनाचे, दुसरे शिल्प राजा सातकर्णी याची पत्नी देवी नायनिकीचे तर तिसरे शिल्प राजा सातकर्णीचे. गुहेवर पाण्याची तीन ते चार टाकी आढळतात. गुहेच्या वर पाहिल्यावर एक प्रचंड कातळ भिंत दिसते. यालाच ‘नानाचा अंगठा’ असे म्हणतात.
घाटमाथ्यावर पोहचल्यावर उजवीकडे वळल्यावर आपण नानाच्या अंगठ्यावर येऊन पोहोचतो येथेच बाजूला एक गणेशाची मूर्तीही दृष्टिक्षेपात येते. समोर दिसणारे गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, हरिश्चंद्रगड, भैरवकडा, कोकणकडा आणि डावीकडे असणारा जीवधन आपले मन मोहून टाकतात.
घाटावरील विस्तीर्ण असे पठार हे नाणेघाटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. अशाप्रकारे मुंबईकरांना एका दिवसात जाऊन येता येईल असा नाणेघाटाचा ट्रेक हा एक सुरेख अनुभव ठरतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
नाणेघाटाला यायचे झाल्यास मुंबई किंवा पुणे गाठावे.
  • मुंबईकरांना नाणेघाटाला यायचे असल्यास कल्याण मुरबाड मार्गे वैशाखरे गावी यावे. वैशाखरे हे जरी पायथ्याचे गाव असले तरी तेथे न उतरता वैशाखरे पासून पुढे दोन कि.मी. अंतरावर असलेल्या नाणेघाट या नामनिर्देशित फलकाच्या मार्गाने थेट दोन तासात आपल्याला नाणेघाटावर पोहचता येते. या वाटेवर पावसाळ्यात दोन ओढ्यांचे दर्शन होते.
  • पुण्याहून नाणेघाटाला यायचे झाल्यास पुणे-जुन्नर एस.टी. पकडून जुन्नरला यावे. जुन्नर ते घाटघर एस.टी पकडून घाटघरला यावे. येथपर्यंत पोहचण्यास दीड तास लागतो. घाटघर वरून ५ कि.मी. चालत नाणेघाट गाठता येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा