तिकोना किल्ला

मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन दिसणारे लोहगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहेत. याच किल्ल्यांच्या मागील बाजूस पवनमाळ प्रांतात असणाऱ्या तिकोना ऊर्फ वितंडगड याची आपण ओळख करून घेऊया. लोहगड आणि विसापूरच्या किल्ल्याच्या मागे हा किल्ला असल्याने थेट नजरेस पडत नाही. सध्याच्या द्रुतगति महामार्गावरून मात्र हा किल्ला सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन बंदराना घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मीती केली होती. साधरणतः या परिसरातील लेणी ही बौद्ध आणि हिनयान पद्धतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले ८०० ते १००० या काळात बांधलेले असावेत.
इतिहास :
इ.स. १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडाबद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी १६५७ मध्ये जुन्या निजामाकडुन कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला व सर्व निजामशाही कोकण शिवरायांच्या हाताखाली आले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर देखरेखा ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये किल्ल्यावर छोट्या-फार प्रमाणात लढाई झाली यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले. आजमितिस किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडाचा घेरा फार मोठा नसल्यामुळे एक तासांत सर्व गड पाहून होतो. गडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे वळावे, थोडे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याचे टाके आणि गुहा लागते. गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहा राहण्यास अयोग्य आहे. गुहेच्या बाजुने वर जाणारी वाटेने थेट बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहचतो. प्रवेशद्वाराच्या पायऱ्या ह्या दमछाक करणाऱ्या आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे पाण्याची टाके आहेत तर डावीकडे तटबंदीचा बुरुज दिसतो. सरळ थोडेवर गेल्यावर एक वाट उजवीकडे उतरते. येथे पाण्याची काही टाकी आढळतात. येथूनमाघाई फिरून सरळ वाटेला लागावे. ही वाट आपल्याला काही तुटलेल्या पायऱ्यांशी घेऊन जाते. येथून वर गेल्यावर समोरच महादेवाचे मंदिर आहे. मंदिरामागे पाण्याचा मोठा खंदक आहे. याला वळसा घालून गेल्यावर आपण ध्वजस्तंभाच्या जागी पोहचतो. बालेकिल्ल्यावरुन समोरच उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्सेचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवनेचा परिसर आणि फागणे धरण हा सर्व परिसर न्याहळता येतो. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो. अशा प्रकारे ४ तासात संपूर्ण गड पाहून परतीच्या प्रवासाला लागु शकतो. सर्व गड फिरण्यास १ तास पुरतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक नागेश्वरमार्गे आणि दुसरा थेट वासोट्याकडे.
  • बेडसे लेण्यामार्गे : अनेक ट्रेकर्स लोहगड, विसापूर, बेडसे लेणे आणि तिकोना सा ट्रेकही करतात. यासाठी बेडसे लेण्या करुन तिकोनापेठेत जाता येते.
  • ब्राम्हणोली मार्गे : अनेक ट्रेकर्स तुंग आणि तिकोना असा ट्रेकही करतात. यासाठी तुंग किल्ला पाहून तुंगवाडीत उतरावे आणि केवरे या गावी यावे येथून लॉंचने पलिकडच्या तीरावरील ब्राम्हणोली या गावी यावे. ब्राम्हणोली ते तिकोनापेठ हे अंतर ३० मिनिटांचे आहे.
  • तिकोनापेठ मार्गे : गडावर जाणाई मुख्य वाट ही तिकोनापेठ या गावातून जाते. यासाठी लोणावळ्याच्या दोन स्टेशन पुढच्या कामशेत स्टेशनावर उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी बस पकडून काळे कॉलनी मध्ये उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी अशी बस सेवा अथवा जीपसेवा उपलब्ध आहे. काळे कॉलनी ते तिकोनापेठ अशी देखील जीपसेवा उपलब्ध आहे. या बसने किंवा जीपने तिकोनापेठ गावं गाठावे. कामशेत पासून सकाळी ८.३० ला सुटणारी पॉंड बस पकडून तिकोनापेठ या गावी उतरावे. तसेच कामशेत ते मोर्सेबस पकडूनही तिकोनापेठला उतरता येते. तिकोनापेठतून ४५ मिनिटात आपण किल्ल्यावर पोहचतो. वाट फार दमछाक करणारी नसून अत्यंत सोपी व सरळ आहे. किल्ल्यावरील दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक वाट जाते. या वाटेने २० मिनिटांतच बालेकिल्ला गाठता येतो.
पावसाळा सोडून इतर सर्व ऋतुत १० ते १५ जणांना गुहे मध्ये राहता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. गडावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाके आहेत. गडावर जाण्यासाठी १ तास लागतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा