हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर हा किल्ला असून याची समुदसपाटी पासूनची उंची २८५१ फूट आहे. रायगड हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे. तर पश्चिमेला गांधारी नदी वाहते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयाला आकाश स्वच्छ असेल तर राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा; उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडपासून मुंबई, पुणे, सातारा ही शहरे सारख्याच अंतरावर आहेत. सह्याद्रीतील किल्ल्यांच्या रांगांतील हा एक दुवा आहे. रायगड हा निसर्गतःच डोंगरांनी वेढलेला असल्यामुळे ( तसेच) शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा यासाठी पुणे सोडून पश्चिम डोंगरात रायगड ही राजधानी महाराजांनी निवडली.
इतिहास :
रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.
रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.
रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महारांजानी राजधानीसाठी या गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते, ‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे द्शगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले. तक्तास जागा हाच गड करावा’. याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. १. रायगड, २. रायरी, ३. इस्लामगड, ४. नंदादीप, ५. जंबुद्विप, ६. तणस, ७. राशिवटा, ८. बदेनूर, ९. रायगिरी, ११. भिवगड, १२ रेड्डी, १३. शिवलंका, १४. राहीर, १५. पूर्वेकडील जिब्राल्टर शिवराज्याभिषेक. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना. ता. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकादि विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत ता. ६ जून १६७४ ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. ता. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी अश्विन शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता.
हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला. कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, ‘शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वस्तीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकींचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ.स. १६७५ फेब्रुवारी ४ शके १५९६ आनंद सवत्सर मागह व ५ गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७ इ.स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले.
इ.स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली. ता २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालुट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३.१२ फेब्रुवारी१६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. a title=”५ एप्रिल” href=”/April-5/”>५ एप्रिल१६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडाचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
- पाचाडचा जिजाबाईचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नस, म्हणून महराजांनी त्यांच्यसाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेल दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
- खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज, बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित् दरवाजा ’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
- नाना दरवाजा : या दरवाजाश ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध नाना फडाणिसांशी लावला जातो ही पूर्णपणे गैरसमजूत आहे. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवड्या’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठीइ खोबणी दिसतात.
- मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. येथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
- महादरवाजा : महादरवाजाच्या बाहेरील अम्गास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात तसेच सरंक्षकासाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
- पाचाडचा जिजाबाईचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नस, म्हणून महराजांनी त्यांच्यसाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेल दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
- चोरदिंडी : महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते,त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाला आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.
- हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तीच्या स्नानासाठी आनि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.
- गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५०-६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्त्सागर व महानद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
- स्तंभ : गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे. ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
- पालखी दरवाजा : स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्याव्र जोदरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्या बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.
- मेणा दरवाजा : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ-उताअ असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
- राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब ३३ फूट रुंद आहे.
- रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
- राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांबव १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’
- नगारखाना : सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हानगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.
- बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फुट रुंद रस्ता आहे.
- शिर्काई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देउळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.
- जगदीश्वर मंदिर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे :श्री गणपतये नमः । प्रासादो जगदीश्वरम्य जगतामानं ददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः ।
शाके षण्णवबाणभूमिगणनादान्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वितिकौ स्तभेःकुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे : ‘सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असे तोवर खुशाल नांदो.’
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ - महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र ते शुद्ध १५ दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यानी बांधिले असून वरून फरसबंदीच्या खाली पोकळी आहे. तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामित्र मृत्तिकरुपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे. ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे ,बारा टाकी दिसतात.
- कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशवर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.
- वाघ दरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरिता गड पाहून एक दोन -तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असते तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
- टकमक टोक : बाजार पेठेच्या समोरिल टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी.
- हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड खुबलढा बुरुज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.
गडावर जाण्याच्या वाटा :
- मुंबई-गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकापासून : मुंबई-गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात. तसेच बस स्थानकात बाहेरून जीपगाड्याही जातात. बसने आल्यावर चित दरवाज्यापाशी, (जो आता अस्तित्वात नाही) जिथे पायऱ्या सुरू होतात तेथे उतरून पायऱ्यांनी गडावर जाता येते. जवळ जवळ १५०० पायऱ्या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो.
- नाना दरवाजाकडून : नाना दरवाजाकडूनही आपण गड चढू शकतो. पायऱ्यांकडून जो डांबरी रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे जाऊन उजवीकडे एक पायवाट जाते. त्या वाटेने गेल्यास नानादरवाजाने आपण गड चढू शकतो.
- रोप-वे : आता गडावर जाण्यासाठी रोप-वेची व्यवस्था झाल्याने पायथ्यापासून १० ते १५ मिनिटांत आपण गडावर पोहचू शकतो.
राहण्याची सोय : रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेमध्ये राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत. तसेच एम.टी.डी.सी. च्या बंगाल्यांमध्ये किंवा डॉरमिटरी हॉलमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. रायगड जिल्हा परिषद, तालुका महाड, जिल्हा रायगड अथवा ‘महाराष्ट्र राज्य पर्यटन केंद्र, एक्सप्रेस टॉवर, नरिमन पॉइंट, मुंबई-२१’ यांच्याशी संपर्क केल्यास राहण्याची सोय होऊ शकेल. पायथ्याच्या पाचाड गावी व गडावर श्री देशमुख यांचे उपहारगृह आहे. पाचाडचा फोन - (९५२१४५) ७४८४८, ७४८८८. गडावर हॉटेल्स आहेत तेथे जेवणाची सोय होते. बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
गडावर जाण्यासाठी २ तास लागतात. पुण्याहून रायगडाला जाण्यासाठी दुपारी १.३० वाजता बस आहे. ती आपल्याला थेट किल्ल्याच्या पायथ्याशी खूबलढा बुरुजापाशी घेऊन जाते. महाडहूनदेखील रायगडासाठी दिवसातून तीन वेळा बस आहे.
खूबलढा बुरुजापासून पायऱ्या चढावयास सुरवात करुन रमत गमत गेले तरी दोन तासात आपण गडावर पोहोचतो. ज्यांना चालण्याने श्रम नको आहेत, अशांसाठी “जोग कन्स्ट्रक्शन” ने सोपी केलेली आहे.
किल्ल्यावर मुक्कामासाठी जिल्हा परिषदेच्या खोल्या आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बंगले आहेत. भोजनाची व्यवस्था देशमुखांचे उपाहारगृह आणि म.प.वि.मं. चे कँटीन येथे होऊ शकते.
जिल्हा परिषदेच्या खोल्यांपाशीच एका मोठ्या फलकावर गडाचे मानचित्र चितारलेले आहे. त्याचा संदर्भ घेऊन संपूर्ण गड फिरणे अवघड नाही अथवा गो. नी. दांडेकराचे “शीवतीर्थ रायगड” हे माहिती पुस्तक देशमुखांच्या उपहारगृहात उपलब्ध आहे. राजसभाम टकमक टोक, बाजारपेठ, जगदीश्वराचे मंदिर, महाराजांची समाधी, हिरकणी बुरुज अशा नामवंत ठिकाणांव्यतिरिक्त वाघ दरवाजा, भवानी टोक अशी ठिकाणेही बघण्यास विसरु नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा