एक शिक्षक ते चीनचा सर्वात श्रीमंत माणूस - अचंबित करणारा प्रवास
सक्सेस स्टोरीज आपल्या सर्वाना आवडतात. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या व्यक्तींच्या एकदम “लार्जर दॅन लाइफ” गोष्टी आपल्याला नेहमीच मोहात पाडतात. खरं तर अनेक उपदेशांपेक्षा या खऱ्याखुऱ्या सत्यकथाच आपल्याला जास्त प्रेरित करतात. मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशाच व्यक्तीबद्दल आणि त्याच्या स्वप्नवत वाटणाऱ्या यशोगाथेबद्दल सांगणार आहे.
मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा माणसाबद्दल ज्याने चीनसारख्या मोठ्या देशाची अर्थव्यवस्था आणि इंटरनेट उद्योगाची बाजारपेठ एकहाती बदलवून टाकली. त्याचे पूर्ण आयुष्य हे एखाद्या चित्रपटकथेला लाजवेल इतके थक्क करणारे आहे.
ही कथा आहे जॅक मा (Jack Ma) याची !!
जॅक मा हा अलिबाबा.कॉम (Alibaba.com) या जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचा आणि अलीपे (Alipay) या ई-पेमेंट कंपनीचा संस्थापक आहे. सध्या तो अधिकृतरीत्या चीनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे. जॅक मा ची संपत्ती तब्बल २५०० करोड अमेरिकी डॉलर्स इतकी महाप्रचंड आहे. जॅक मा च्या अलिबाबा या कंपनीने २०१४ मध्ये अमेरिकेच्या शेअरमार्केट मध्ये प्रवेश केला आणि त्यात अमेरिकेच्या (आणि जगाच्या) इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक (तब्बल १५००० करोड अमेरिकी डॉलर्स) नोंदवण्यात आली. अलीबाबा या कंपनीचे केवळ 7.8% शेअर्स हाती असताना जॅक मा एवढा श्रीमंत आहे, याहून अधिक शेअर्स असते तर जॅक मा ची संपत्ती किती वाढली असती याचा विचार न केलेलाच बरा..
हे सर्व आकडे पाहून तुमच्या डोळ्यासमोर एखादया गर्विष्ठ आणि गर्भश्रीमंत माणसाचा चेहरा आला असेल ना... परंतु हीच खरी कथा आहे... जॅक मा हा एका गरीब घराण्यातून आलेला साधासुधा मनुष्य आहे. अलिबाबा.कॉम सुरु करण्याआधी जॅक एक इंग्लिश शिक्षक म्हणून काम करत होता. पण शिक्षक म्हणून स्थिरावण्याच्या आधीही जॅकने बऱ्याच खचता खाल्या आहेत. इतक्या की ‘जॅक = अपयश’ हे एक समीकरणच बनून गेले होते.
जॅक चे खरे नाव आहे "मा युन". चीनमधील Hangzhou या प्रांतात मोठा भाऊ आणि धाकट्या बहिणीसोबत जॅक लहानाचा मोठा झाला. त्याचा जन्म १९६४ सालचा. आई-वडील जागोजागी संगीतातून कथाकथनाचे खेळ करायचे. घराची परिस्थिती मध्यमवर्गाहून थोडी कमी म्हणता येईल अशी. लहानपणापासून जॅकने नापास होण्याचा सपाटाच लावलेला. प्राथमिक शाळेत तो दोनदा नापास झाला. माध्यमिक शाळेत तीन वेळा नापास झाला. महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठीच्या पूर्वपरीक्षेत तीन वेळा नापास झाला तेव्हा कुठे त्याचा कॉलेजप्रवास सुरु झाला. हे झालं शिक्षणाचं !
पुढे नोकरीच्या बाबतीत तर जॅकने आणखीनच अपयश पाहिलं. तीन वर्षे प्रवेशासाठी वाट पाहिल्यानंतर तीन वर्षानी जॅकने पदवी प्राप्त केली खरी पण पहिली नोकरी मिळवण्याआधी जॅकला ३० वेळा नकार ऐकावा लागला. त्यापैकीच एक नकार होता जगप्रसिद्ध KFC चा. जेव्हा KFC चीन मध्ये नुकताच आली होती तेव्हा जॅक राहायचा त्या भागातील २४ जणांनी तेथे जॉबसाठी प्रयत्न केला होता. त्यापैकी जॅक वगळता इतर २३ जणांना नोकरी मिळाली होती. जॅकने पोलिसात भरती होण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तिथेही त्याच्या पदरी निराशाच आली.
कॉलेजचे शिक्षण इंग्लिशमधून झाले असल्याने जॅकचे इंग्रजी थोडेफार बरे होते म्हणून त्याने काही दिवस "टुरीस्ट गाईड" म्हणून देखील काम केले. तेथेच त्याला एका परदेशी पर्यटक मुलीने जॅक हे नाव दिले. पुढे होता होता जॅक एक इंग्लिश शिक्षक म्हणून स्थिरावला. आणि त्यानंतर जॅकच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणारी एक गोष्ट झाली. १९९५ मध्ये चीन सरकारच्या एका उपक्रमाअंतर्गत जॅकला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याचे वय होते अवघे ३१ वर्षे.
अमेरिकेमध्ये जॅकचा कम्प्युटर्स आणि इंटरनेटशी पहिल्यांदा संबंध आला. तेव्हा चीन मध्ये कम्प्युटर्स अतिशय दुर्मिळ होते. इंटरनेट आणि इमेल्स तर जवळजवळ अस्तित्वातच नव्हत्या. नेटवर त्याने चायना असं सर्च केल्यावर त्याला काहीच माहिती मिळाली नाही. आपल्या देशातही हे असावं असं जॅकला वाटू लागलं. त्याने तसं वेडच घेतलं. हे स्वप्न घेऊन जॅक मायदेशी परतला.
सर्वप्रथम काही मित्रांकडून पैसे घेऊन त्याने व्यवसायाला सुरुवात केली. प्रोग्रामिंगचे अजिबात ज्ञान नसताना, व्यवसायाचा आणि विक्रीचा काहीही अनुभव पाठीशी नसतांना आणि मुख्य म्हणजे इंटरनेट वापरणारा पुरेसा ग्राहकवर्ग नसतानाही जॅकने अलिबाबा ही ई-कॉमर्स कंपनी सुरु केली. ऑनलाईन खरेदी करणे हे सोयीचे आणि सुरक्षित आहे हे ग्राहकाना पटवून देण्यात अलिबाबाने बराच वेळ खर्ची घातला. पण हळूहळू जॅकला यश येऊ लागले. पुढे जसजसा इंटरनेटचा प्रसार वाढत गेला तसा अलिबाबाचा पसारा देखील वाढत गेला आणि बघता बघता अलिबाबा.कॉम ही चीनमधील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनली.
अलिबाबाचा पसारा केवळ चीन पुरताच मर्यादित न ठेवता जॅकने जगात इतर देशातही पाय रोवायला सुरुवात केली. इतकी की आता जगभरात सर्वाधिक विक्री असणाऱ्या कंपन्यांमध्ये अलिबाबा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला नंबर आहे वॉलमार्टचा. जॅक मा नावाच्या एका साध्या माणसाने केवळ २० वर्षात एक अजस्त्र कंपनी उभी केली. हे शक्य झाले ते केवळ मोठ ध्येय उराशी बाळगण्याने आणि अपयशाने खचून न जाण्याच्या जॅकच्या वृत्तीमुळे.
ध्येय ठरवणे, आपल्या ध्येयावर विश्वास असणे आणि ते पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करणे ही यशस्वी उद्योगाची/उद्योजकाची मुख्य त्रिसूत्री आहे. जॅकने देखील याचा पुरेपूर प्रत्यय दिला आहे. नुकताच जॅक मा याने भारताच्या स्नॅपडील (Snapdeal) आणि पेटीएम (PayTM) या कंपन्यामध्ये गुंतवणूक करून भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे.
Source : सलिल चौधरी